हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सूर्यकुमारच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तसेच या खराब प्रदर्शनानंतर सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. परतु तुम्हाला माहित आहे का? सलग 3 वेळा गोल्डन डकचा शिकार झालेला सूर्यकुमार 6 वा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी 5 खेळाडू सलग तीन सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद झालेत. विशेष म्हणजे यामध्ये क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया ते कोणते खेळाडू आहेत
सूर्यकुमार यादव यांच्यापूर्वी जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, झहीर खान हे सलग 3 सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यातील सचिन सोडला तर बाकीचे सर्व गोलंदाज आहेत. कधीतरी त्यांना फलंदाजीची संधी मिळते. आता यामध्ये सूर्यकुमार यादवची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार सलग तीनवेळा पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला. पहिल्या 2 सामन्यात सूर्यकुमार मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचित झाला तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍश्टन अगरने त्याचा त्रिफळा उडवला.
दरम्यान, सूर्यकुमारच्या या खराब प्रदर्शनानंतरहि कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठराखण केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत तो फक्त 3 च चेंडू खेळू शकला हे दुर्दैवी आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव तीन सर्वोत्तम चेंडूंवर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात सूर्याने चुकीचा शॉट निवडल्याचे रोहित म्हणाला. सूर्याला आपण आधीच ओळखतो, सूर्याकडे गुणवत्ता आणि क्षमता आहे असं म्हणत रोहितने त्याची पाठराखण केली.