खंडाळा | दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्या अट्टल चोरट्याला खंडाळा पोलीसांनी पाठलाग करीत बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर याठिकाणी ताब्यात घेतले आहे. वाई व खंडाळा तालुक्यात या चोरट्याने दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील सोने लंपास केले आहे. अजिंक्य अशोक शिंदे (रा. चोपडज वाकी, ता. बारामती जि.पुणे) असे शिताफीने अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. संबंधित चोरट्याकडून खंडाळा व भुईंज पोलीस स्टेशन हद्दीमधील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून दुचाकीसह तब्बल 1 लाख 12 हजर 556 रुपयांचा मुद्देमाल खंडाळा पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबतची खंडाळा पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, गेल्या एक महिन्यापासून खंडाळासह वाई तालुक्यातील वेळे परिसरामध्ये दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. त्यानुसार सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी सदरच्या घटना उघडकीस आणण्याकरिता खंडाळा पोलीस स्टाईनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना सूचना केल्या होत्या. यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार सुरेश मोरे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ यांच्या पथकाने सखोल तपास करीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारा अट्टल चोरटा अजिंक्य शिंदे हा बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर याठिकाणी येणार असल्याची माहिती खंडाळा पोलीसांना मिळाली.
त्यानुसार खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार सुरेश मोरे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी संपला रचला असता अजिंक्य शिंदे याला पोलीसांची चाहूल लागताच पलायन करण्याचा प्रयत्न केला असता खंडाळा पोलीसांनी अजिंक्य शिंदे याचा थरारक पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे संबंधित चोरटा अजिंक्य शिंदे यांच्याकडून खंडाळा व भुईंज पोलीस स्टेशन हद्दीमधील तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये खंडाळा पोलीसांना यश आले असून दुचाकीसह तब्बल 1 लाख 12 हजर 556 रुपयांचा मुद्देमाल खंडाळा पोलीसांनी जप्त केला आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे हे करीत आहे.