‘या’ चोरीची जिल्हाभर चर्चा ! एकही पुरावा न सोडता चोरटयांचा किराणामाल दुकानावर डल्ला

Dahivadi Police Station crime news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जिल्हातील शहरी भागात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी चोरटयांकडून घरफोडीसह आता किराणा माल दुकानांनाही टार्गेट केले जात आहे. अशाच एका मोठ्या चोरीची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील एकतानगर परिसरातील किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. यामध्ये तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल व साहित्य चोरट्यांनी लंपास केला आहे. यावेळी कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी चोरट्यांनी चक्क 2 सीसीटीव्हींसह त्याचे मेमरीकार्डही चोरून नेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवडी येथील एकतानगर परिसरात अरिहंत किराणा स्टोअर असे किराणा मालाचे दुकान असून या ठिकाणी नुकतीच चोरीची घटना उघडकीस आली आहे. या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बुरखाधारी चोरट्याची चोरी कैद झाली आहे. दहिवडी येथे मयूर दोशी, स्वागत दोशी व वैभव दोशी हे तिघे भाऊ हे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. नुकतीच त्यांनी नवीन मालाची ऑर्डर केली होती. त्यानुसार त्यांनी दुकानात मोठ्या प्रमाणात माल देखील भरला.

दहिवडीत चोरीच्या घटना देखील घडत असल्यामुळे त्यांनी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले होते. मात्र, सोमवारी मध्यरात्रीच्यावेळी चोरटयांनी दुकानात प्रवेश करत दुकानातील 5 लाख रुपयांचे किराणा मालाचे साहित्य लंपास केले. दुसऱ्या दिवशी दुकान मालक स्वागत दोशी हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान चोरीची ही घटना सीसीसीटीव्हीत कैद झाली असून दुकानातून किराणा माल चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चारचाकी आणली होती. दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रे कापून अतिशय सावधपणे चोरटयांनी मुद्देमाल व किराणा माल लंपास केला. या चोरीच्या तपासासाठी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाडून पुरावे घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दहिवडीतील अन्य ठिकाणावरील सीसीटीव्ही तपासले असून चोरट्यांच्या तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. दहिवडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.

पारले बिस्किटच्या बॉक्सपासून तेलाचे 45 डबे लंपास

यावेळी चोरटयांनी किराणामाल दुकानाला टार्गेट केले. त्यांनी तेलाचे 45 डबे, साबुदाण्याची 50 किलोची 3 पोती, खोबऱ्याच्या 15 किलोच्या 13 पिशव्या, 5 किलो मसाल्याचा एक बॉक्स, 60 किलो वजनाच्या बदामाच्या 2 पिशव्या, 20 किलो वजनाच्या काजूच्या 2 पिशव्या, 10 किलो साधे मणुके, 20 किलो जिऱ्याचे प्रत्येकी पिशव्या, 30 किलो तूरडाळ, 30 किलो मूगडाळ, पारले बिस्किटाचे 5 बॉक्स, साबणाचा 1 बॉक्स, चहा पावडर, 11 किलो खारीक, 27 किलो मिरे असा तब्बल 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.