औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या बैठकीत सदर प्रस्तावाची चर्चा झाल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले,’ MIM आम्हाला साथ देऊच शकत नाहीत. शिवसेना कधीही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाहीत. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांना आमच्याच औरंगाबादमधल्या सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवलं होतं. आम्ही कसं सहन करणार? म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. त्यामुळे ही यांची छुपी ऑफर आहे. आमचे जुने मित्र देवेंद्रजी फडणवीस यांची ही कल्पना आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केल आहे.
महाविकास आघाडीत येण्याविषयी वक्तव्य करण्याचा खासदार इम्तियाज जलील यांना काय अधिकार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले, ‘शहरात काय काम आहे MIM चं? शहरातले मुस्लिम बांधव, बाकीचे नागरिक त्यांना कंटाळले आहेत. काम करत नाहीत म्हणून चला महाविकास आघाडीत जाऊ, असं वाटतंय त्यांना. पण त्यांना अजिबात चान्स नाही. महाविकास आघाडी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच राहिल. ती सतत चांगलं काम करेल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.