हीच योग्य वेळ आहे तुमचा एस.आय.पी. चालू करण्याची, आजच गुंतवणुक करा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेअर बाजार गडगडला आहे .. गुंतवणुकीची हीच योग्य संधी आहे .. वाचकहो, हा लेख त्याबद्दल नाही.

विशेष लेख | अनिकेत करजगीकर

 

दोस्तहो, आपण कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अभूतपूर्व असा देशव्यापी बंद पाळत आहोत. जर तुम्हाला या महिन्याचा पगार घरबसल्या काम करून मिळाला असेल अथवा माझ्यासारखं काहीच न करताही मिळाला असेल, तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. पण असे बरेच लोक आहेत जे तुम्हा -माझ्याएवढे भाग्यवान नाहीत, ज्यांचं रोजच जेवण हे त्यांच्या दिवसभराच्या मेहनतीवर अवलंबून असत. आपले रिक्षावाले काका, बांधकाम मजूर, रोडवरील ठेलेवाले इ. लोकांची या बंदमुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे.

आताच्या या संकटात आपण सगळेच गुरफटले गेलो आहोत. ना कोणतं औषध ना कोणती लस ना कोणतं वेळापत्रक ज्यामध्ये ही महामारी संपून जाईल याचा अंदाज. म्हणूनच मी म्हणतोय की हीच योग्य वेळ आहे तुमचा एस.आय.पी. चालू करण्याची. एस.आय.पी. अर्थात Societal Investment Plan, म्हणजेच सामाजिक हितासाठीची गुंतवणूक योजना. (शॉर्ट -फॉर्म वापरायची ही प्रेरणा आपल्या मा. पंतप्रधानांकडून मिळाली, असो..) सामाजिक हितासाठी केलेली गुंतवणूक नक्कीच आपल्याला व एकूण मानवतेला भरभरून परतावा देईल, यात शंका नाही. रॉबर्ट कियोसाकी यांनीही आपल्या प्रसिद्ध ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकात म्हटलं आहे की, ‘जेवढं जास्त द्याल, तेवढं जास्त मिळेल’.

तर मग कशाची वाट पाहताय? स्वतः लाच विचारा या महिन्यात ऑफिसला न जाण्यामुळे पेट्रोलचा तसेच या बंदमुळे ना वीकेंड पार्टी, ना मित्रांसोबतच बाहेरील जेवण, ना सिनेमा इ. बरेच फालतू खर्च तुमचे वाचले आहेत. हे असेही व्यर्थ जाणारे पैसे तुम्ही सरकारी मदत निधी अथवा सामाजिक संस्थांना देऊन सत्कर्मी लावू शकता. माझ्या दृष्टीने सामाजिक संस्थांना मदत करणे जास्त बरोबर राहील, कारण तुम्ही तुमचे पैसे कसे खर्च झाले याचा अहवाल त्यांना मागू शकता. शेवटी तुम्हाला कोणाला मदत करायची आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे.

या महामारीच्या संकटानंतरसुद्धा तुम्ही ही एस.आय.पी. ची सवय तशीच चालू ठेवावी, असे मला वाटते. कोणतीही खात्री असलेली सामाजिक संस्था निवडा अथवा ज्या सामाजिक प्रश्नाबद्दल तुम्हाला खरोखरीची कळकळ वाटते, त्या प्रश्नावर काम करणारी सामाजिक संस्था शोधा व त्या संस्थेला दर महिन्याला एका विशिष्ट तारखेस एका ठराविक रक्कमेची मदत पाठवा. (याउपर मी म्हणेन की दर वर्षी काही ठराविक टक्क्यांनी ही रक्कम वाढवाही.) पण याबरोबरच नियमितपणे त्या सामाजिक संस्थेचे वार्षिक तसेच त्रैमासिक अहवाल वाचा, त्यामध्ये काही प्रश्न असतील तर त्या संस्थेला ते विचारा आणि जर समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर तुमची मदत दुसऱ्या संस्थेकडे वर्ग करा. आपल्यामधील पुष्कळ जणांनी जर अस करायचं ठरवलं, तर खूप मोठा सकारात्मक बदल आपल्या आसपासच्या समाजात/परिसरात घडून येईल. हा तोच समाज/परिसर आहे जिथे आपण राहतो, जिथे आपली पुढची पिढी राहणार आहे. आपण जर तो सुधारला तर त्यात नक्कीच सगळ्यांच भलं आहे.

जर हा लेख वाचून किमान एकाने एस.आय.पी. सुरु करण्याचं ठरवलं, तर हे लिहिण्याचा माझा हेतू साध्य झाला असे मी मानेन. धन्यवाद!

अनिकेत गोविंद करजगीकर
संपर्क क्रमांक : 9595850496
(लेखक पुण्यामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच निर्माण शैक्षणिक प्रक्रियेचा विद्यार्थी आहे.)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

Leave a Comment