हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना करण्यात आली आहे. परंतु या निवडणुकींपूर्वीच इंडिया आघाडीला एक एक धक्के बसत आहेत. कारण, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यानंतर भगवंत मान यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता झारखंडमधील एक पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.
नुकतीच काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आपण 14 पैकी आठ जागांवर एकटे लढणार असल्याचे रविवारी जाहीर केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव महेंद्र पाठक यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले आहे की, “आम्ही स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे, पण अजूनही काँग्रेसने जागावाटपावर चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे”
त्याचबरोबर, “झारखंड प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रांची, हजारीबाग, कोडरमा, चतरा, पलामू, गिरीडीह, दुमका आणि जमशेटपूर या जागांवर सीपीआय उमेदवार देणार आहे. उमेदवारांची घोषणा १६ मार्च किंवा त्यानंतर करण्यात येईल.” अशी माहिती महेंद्र पाठक यांनी दिली आहे. कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीला याचा मोठा झटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.