हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, मध्य रेल्वेच्या सेवेत वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना ही करावा लागतो. म्हणूनच आता या अडचणी सोडवण्यासाठी मुंबई रेल्वेने एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्याचा फायदा दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच मध्य रेल्वे प्रवाशांना लोकल ट्रेनची अचूक माहिती मोबाईलद्वारे देणार आहे. लोकल ट्रेन कोणत्या स्थानकात आहे? ती प्लॅटफॉर्मवर किती वेळात येईल? याची माहिती आता प्रवाशांना एम इंडिकेटरद्वारे उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिन्याभरात ही नवी सेवा सुरू होणार आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेवर ही सूविधा उपलब्ध होती. मात्र आता ती मध्य रेल्वेवर देखील सुरू होणार आहे.
दरम्यान, एम इंडिकेटरवर ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वे वेळापत्रकाबद्दल अचूक माहिती मिळेल. यासह प्रवास अधिक सोयीस्कर होईल. तसेच प्रवाशांच्या तक्रारी देखील कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या ही यंत्रणा सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे वेगाने काम करत असल्याचे सांगितले जात आहे.