हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात येत्या 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी कार्तिकी पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येतो. परंतु, यावर्षी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे यातील नेमका कोणाला पूजेचा मान मिळेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच मराठा समाजाने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विरोध दर्शवत यंदा पूजेचा मान मनोज जरांगे पाटील यांना देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सध्याची स्थिती बघता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना देखील कार्तिकी पूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या पूजेच्या करण्याचा मान मनोज जरांगे यांना देण्यात यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.
त्याचबरोबर, यंदा कार्तिकी पूजा जरांगे पाटील यांनी करावी अशी इच्छा मराठा समाजाने व्यक्त केली आहे. “कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी उपमुख्यमंत्री करतात. मात्र, यंदा ही पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करू नये, यावर्षी ही पूजा जरांगे पाटील यांनी करावी” अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. दरम्यान, यंदाची कार्तिकी पूजा जरांगे पाटील यांनी करावी, या मागणीबाबत स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना, “कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, पण मला बोलले हेच खूप झालं आहे” असं जरांगे पाटील यांनी म्हणल आहे.