“छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर मनामनात व्हावा” – चिन्मय मांडलेकर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्रच नसता, महाराज हेच सर्वांचे दैवत आहेत आणि ते आता सर्वांचे स्टेट्स बनत चालले आहेत. महाराजांबद्दल पूर्वी चुकीचे लिहिले जात होते. पण आता त्यांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून जागर केला जात आहे. त्यांच्या विचारांचा जागर सर्वांच्या मनामनात होणे आवश्यक असल्याचे मत मराठी सिनेअभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी बोलताना व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या आठ चित्रपटांची मालिका करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ‘शेर शिवराज’ हा सिनेमा 22 एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला चिन्मय मांडलेकर सांगलीत आले होते.

यावेळी चिन्मय मांडलेकर यांचे स्वागत आंबाबाई संस्थेचे अध्यक्ष व जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे, व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ भोकरे, कार्यकारी संचालक पराग इनामदार, दैनिक जनप्रवासचे संपादक हणमंत मोहिते यांनी केले. यावेळी बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणाले,”फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर आता ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.” भविष्यात छत्रपतींचे आणखी चार चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.