कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसकडून देगलूर येथे दाखल होणाऱ्या भारत जोडो यात्रेसाठी हजारो कार्यकर्ते रवाना झाले. कराड येथे आज सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या नफरत छोडो, भारत जोडो यात्रेचे आज सायंकाळी महाराष्ट्र राज्यात स्वागत होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी कराड व पाटण तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सकाळी 7 वाजता रवाना झाले.
या कार्यकर्त्यांच्या बसला काँग्रेसचे नेते इंद्रजित चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, कराड दक्षिणच्या महिला अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निलम येडगे, गिताजंली थोरात, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शंकरराव खबाले, निवासराव थोरात, नगरसेवक राजेंद्र यादव यांनी झेंडा दाखवून रवाना केले.
मनोहर शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांच्या यात्रेत अनेक जाती – धर्मातील लोक काँग्रेसशी जोडत आहेत. तरूणांचा काँग्रेस आणि राहुल गांधींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जात आहोत. काँग्रेस पक्षाच्या ध्येय, धोरणामुळे एकसंध भारत रहायला आहे.