हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. परंतु हा दौरा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला ११ फेब्रुवारी रोजी एक धमकीचा कॉल आला होता. अज्ञात व्यक्तीने मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा दिला.
मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने आपला तपास सुरू केला. तसेच, केंद्र सरकारच्या सुरक्षा संस्थांना याची माहिती दिली. प्राथमिक तपासात समोर आले की, हा कॉल चेंबूर परिसरातून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी लगेच फोन केलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. या तपासादरम्यान समोर आले की, धमकी देणारी व्यक्ती मानसिकरित्या अस्थिर आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये देखील मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अशाच प्रकारचा फोन आला होता. त्याआधी, २०२३ मध्ये हरियाणातील एका व्यक्तीने व्हिडिओ कॉलद्वारे मोदींना गोळी मारण्याची धमकी दिली होती. २०२२ मध्येही ‘जेवियर’ नावाच्या व्यक्तीने पंतप्रधानांविरोधात धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता.