निफाड प्रतिनिधी | बाजारात मिळणाऱ्या दारावर शेतमालाचे भवितव्य अवलंबून असते असे म्हणतात त्याचाच प्रत्येय नाशिक जिल्ह्यात आला आहे. निफाड तालुक्यातल्या कोकणागाव येथील आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरमध्ये कोथिंबीर लावली होती आता कोथिंबीर महाग असल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातली कोथिंबीर बांधवरच १७ लाखात विकत घेतली.
भाज्यांना चव आणणारी आणि मसाल्यांच्या पदार्थांना पाचक बनवणारी बहुगुणी कोथिंबीर सध्या खूपच महाग आहे. याचा फायदा कोथिंबीर उत्पादकांना मिळतो आहे पण शेतकरी फार कमी जागेत कोथिंबिरीचे उत्पादन घेत असल्याने शेतकऱ्यांना फार थोड्या प्रमाणात याचा फायदा मिळतो. आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांनी मात्र साडेतीन तीन एकरमध्ये कोथिंबीर लावल्याने त्यांचे नशीब फळफळले.
सध्या फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर सुरेश आणि आसिफ हिरो झालेत. पिकांच्या लावणीचं आणि उत्पादनाचं स्मार्ट नियोजन केलं की त्याचा स्मार्ट परतावा मिळतो, हे आसिफ आणि सुरेश यांनी दाखवून दिलंय. कोणतं पीक कोणत्या काळात घ्यावं? आणि त्याचं कसं नियोजन करावं? याची यशस्वी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. असे सल्ले नेटीजन्स देत आहे.
कोथिंबिरीचे पीक ५० दिवसात येते त्यामुळे आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांची कमाई ५० दिवसात १७ लाख असेही हिशेब लावण्यात येत आहेत पण ते खरे नाहीत कारण यात उत्पादनाचा खर्च धरलेला नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यात जर – तर बरेच आहेत; एकदम सरळसोट यश नाही. तरीही आसिफ सय्यद आणि सुरेश जाधवयांना कोथिंबिरीने चांगला नफा मिळवून दिला हे खरे आहे.