मुंबईत मालाड पाठोपाठ दहिसरमध्ये तीन घर कोसळली, एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुंबईत बुधवारी रात्री तीन मजली इमारत पडल्याची घटना घडल्यानंतर गुरूवारी आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास 3 घरे पडलेली आहेत. पहिल्याच पावसानंतर मालाड आणि चोवीस तासांच्या आतच दहिसरमध्ये 3 घरे कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडी चाळ, शंकर मंदिराजवळ केतकीपाडा, शिवाजीनगर दहिसर पूर्व या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. घराखालची माती सरकल्यामुळे 3 घरं कोसळल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. या दुर्घटनेत प्रद्युम्न सरोज (वय- 26) तरुणाचा मृत्यू झाला आहे.  त्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.

मुंबईत चोवीस तासात दुसऱ्यांदा झालेल्या या दुर्घटनेने धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबई महापालिका काय भूमिका घेणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. मालाड पाठोपाठ दहिसरमध्ये झालेल्या या दुर्घटनेने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी अग्नीशामक दलाने बचावकार्य सुरू केले आहे.