औरंगाबाद | गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी करणाऱ्या तीन मित्रांना मुंबई करमाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 9 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी लाडगाव शिवारात करण्यात आली. हे तिघे मित्र मजा करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणाहून तसेच पर्यटन ठिकाणाहून दुचाकी चोरी करायचे. शाम भरत खांडेभराड (19, रा. चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना), विकास ज्ञानदेव मंडलिक (19, रा. बाजार वाहेगाव, ता. बदनापूर, जि. जालना) व बळीराम ज्ञानदेव काळे (23, रा. बाजार वाहेगाव, ता. बदनापूर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद जालना मार्गावर लाडगाव शिवारात तीन तरुण तीन दुचाकीवरून जात होते. या दुचाकीवर नंबर प्लेट नव्हती. गस्तीवर असलेले करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आनंद घाटेश्वर, ताराचंद घडे व चालक नारायण भिसे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या तरुणांची चौकशीकरून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी तीन पैकी दोन मोटरसायकल पैठणगेट गुलमंडी येथून चोरून आणल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी चोरून विकलेल्या सात दुचाकी बुधवारी बाजार वाहेगाव, राळहिवरा, चिकनगाव व मात्रेवाडी येथून जप्त केल्या. आरोपी या दुचाक्या ग्रामीण भागात नेऊन विकत.