सांगली | टोळी जमवून, कट करून दरोडे टाकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तिघांना मोक्का कायद्यांतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश तथा मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील चंद्रशेखर ऊर्फ राजू चौगुले यांनी काम पाहिले. विनायक काकड्या काळे (वय- 40), राजू गुलाब शेख (वय -47, दोघे रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) धनाजी उर्फ धनंजय जाकीरा पवार (वय- 40, रा. बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
खानापूर तालुक्यातील पळशी येथे सन 2014 मध्ये जगन्नाथ श्रीरंग कदम यांच्या घरी दरोडा पडला होता. संशयितांनी घरात प्रवेश करून कृष्णदेव जगन्नाथ कदम यांच्या डोक्यात प्राणघातक हत्याराने मारून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ जबरस्तीने चोरून नेली होती. यावेळी अरविंद कदम यांनाही जबर मारहाण केली होती. याप्रकरणी जगन्नाथ कदम यांचे चुलतभाऊ शंकर कदम यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या दरोड्याप्रकरणी तिघांना अटक केली होती. या सराईत दरोडेखोरांवर सांगली व सातारा जिल्ह्यात त्यांच्यावर 23 गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते.
तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभिजित पाटील यांनी तपास करून तिघांविरूध्द मोका, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न टोळी जमवून कट करणे अशा कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले. पूर्वी मोका न्यायालय पुणे येथे असल्याने सुरुवातीला या खटल्याची सुनावणी पुणे येथे झाली होती. एक वर्षापूर्वी मोका न्यायालय सांगलीत सुरू झाल्याने या खटल्याची सुनावणी नंतर सांगलीत झाली. या खटल्यात 19 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी शंकर कदम, जयश्री कदम व सचिन खाडे यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने भा.दं.वि. कलम ३९४ व ३९७ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक कलमासाठी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली.