हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेम विवाहासाठी मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या कुटुंबीयांसह एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना काल सोमवारी रात्री राजमाची – सुर्ली, ता. कराड येथील घाटात घडली होती. यामध्ये एका जणाचा खून झाला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रायटी उशिरा तिघांना अटक केली होती. त्यांना आज मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जनार्दन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर विकास पाडळे, बाबासाहेब पवार, विनायक चंदुगडे सर्व (रा. हजारमाची ता. कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. प्रमोद विश्वास पवार (रा. राजमाची, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हजारमाची येथील युवती व राजमाचीतील युवक हर दोघेजण काही दिवसांपासून बेपत्ता आहे. संबंधीत युवतीला राजमाचीतील युवकाने पळवून नेल्याचा युवतीच्या कुटूंबियांना संशय होता. त्या कारणावरुन युवतीचे नातेवाईक चिडून होते. दरम्यान, सोमवारी रात्री युवतीचे नातेवाईक राजमाची येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी संबंधित युवकाच्या कुटूंबियांना धमकावत युवतीला घेवून युवक कुठे गेला आहे?, अशी विचारणा केली.
मात्र, कुटूंबियांकडून त्यांना काहीच माहिती मिळाली नसल्यामुळे युवतीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी व युवकांनी पळवून नेलेल्या युवकाच्या आई, वडिल तसेच भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच भाऊ, वडिल व जनार्दन गुरव या तिघांना चारचाकी गाडीतून जबरदस्तीने सुर्ली घाटात नेवून त्याठिकाणीही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जनार्दन गुरव हे गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले. बेशुद्ध पडल्यानंतर काही व्यक्ती त्यांना कृष्णा रुग्णालयात सोडून गेले होते. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा डॉक्टरांनी घोषित केले.
आरोपींना न्यायालयात केले हजर…
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस हजाराची तसेच राजमाची गावात दाखल होत दहा जणांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा चौकशीनंतर या घटनेप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी तपास करीत आहेत.
उपसरपंच निवडी दिवशीच घडली घटना
हजारमाची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया काल सोमवारी पार पडली. नवनिर्वाचित उपसरपंचाच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला होता. गुलालात माखलेल्या कपड्यानिशी हजारमाचीतील तरूण रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात होते.