टीम हॅलो महाराष्ट्र । भारतीय संघात ‘द वॉल’ अशी ओळख असलेल्या राहुल द्रवीडचा आज ४७वा वाढदिवस आहे. वनडे आणि कसोटीमधील भारतीय संघातील क्रमांक तीनचा सर्वोत्तम फलंदाज राहुल द्रवीडवर आज सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या संयमी आणि चिवट फलंदाजीतून भल्या-भल्या गोलंदाजांना नाकी आणणारा खेळाडू अशी ओळख द्रविडची क्रिकेट विश्वात आहे. आज द्रवीडच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या क्रिकेट विश्वातील कामगिरीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
भारताकडून १९९६मध्ये पदार्पण करणाऱ्या द्रवीडने १६ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये १६४ कसोटी, ३३४ वनडे आणि एका टी-२० सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले. सचिन तेंडुलकर वगळता राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने वनडे आणि कसोटीमध्ये १० हजारहून अधिक धावा केल्या. १९९६साली राहुल द्रविडने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स च्या मैदानावरून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ९५ धावांची खेळी केली.द्रविडने ३४४ एकदिवसीय सामने खेळले. त्यात त्याने १० हजार ८९९ धावा केल्या.
इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. २००० असली विस्डेन ने निवडलेल्या सर्वोत्तम ५ क्रिकेटपटूंमध्ये द्रविडचा समावेश करण्यात आला होता. ९ मार्च २०१२ ला राहुल द्रविडने आपल्या १६ वर्षाच्या समृद्ध कारकिर्दीला ‘ब्रेक’ लावला आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. ‘द वॉल’ राहुल द्रविडला २०१३ साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१८ ला ICC च्या मानाच्या Hall of Fame मध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला. त्यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलिया चा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यालाही हा बहुमान प्रदान करण्यात आला.