औरंगाबाद – शहरासह औरंगाबाद जिल्ह्याला एका महिन्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टीने झोडपून काढले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत, अनेकांच्या शेती पाण्याखाली गेल्या आहेत तर काहींच्या घरावरचे छत उडाले आहे. अशा नैसर्गिक संकटातून औरंगाबाद जिल्ह्यातील जनता जात असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना मात्र आपल्या ‘उद्योगातून’ वेळ मिळाला नाही. परंतु आता अतिवृष्टी झाल्यावर एक, दोन नव्हे तर फक्त 10 दिवसांनी त्यांना आपल्या पालकत्वाची आठवण झाली आणि ते गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला मागील एका महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा अतिवृष्टीने झोडपून काढले. यामुळे बहुतांश नदी-नाल्यांना महापूर येऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली होती. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. इतरही अनेक प्रकारचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे. आपण पालकत्व घेतलेल्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पालकमंत्री मात्र आपल्या उद्योगात व्यस्त होते. आता अतिवृष्टी नंतर दहा दिवसांनी आपल्या उद्योगातून पालकमंत्र्यांना सवड मिळाल्याने त्यांना आपण पालकत्व घेतलेल्या जिल्ह्याची आठवण झाली असावी आणि ते आता जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असावेत अशी चर्चा सध्या सुरू आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी 72 तासांची वाट पाहिली. अतिवृष्टी नंतर 72 तासांनी पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी अतिवृष्टी झाल्यानंतर एक ते दोन दिवसात प्रत्यक्ष भेट देणे अपेक्षित होते. मात्र ते आपल्या उद्योगातून वेळ काढू शकले नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मदत करण्याचे आश्वासन देत होते आणि त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री आता अतिवृष्टी झाल्यानंतर दहा दिवसांनी दौऱ्यावर येत आहेत. वृष्टी होऊन आता नऊ-दहा दिवस उलटल्यानंतर पालकमंत्र्यांना झालेले नुकसान किती प्रमाणात प्रत्यक्ष पाहायला मिळेल हे सांगणे कठीणच आहे. त्यामुळे खरंच जितके नुकसान झाले आहे तितके त्यांना पाहायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दोन मंत्री असताना बाहेरचे पालकमंत्री का ?
औरंगाबाद जिल्ह्यात सरकार मध्ये समाविष्ट असलेले दोन मंत्री आहेत. त्यामध्ये पैठणचे आमदार संदिपान भुमरे हे फलोत्पादन मंत्री आहेत. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून हे दोन आमदार मंत्रिमंडळात असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र बाहेर जिल्ह्यातले आहेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. यामुळे एकाप्रकारे औरंगाबादकरांवर अन्याय होत असल्याची भावना जिल्हावासीयांना मधून उमटत आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांना इतर जिल्ह्याचे पालक मंत्री करण्यात आलेले आहे. त्यामध्ये संदिपान भुमरे यांना यवतमाळचे पालक मंत्री तर अब्दुल सत्तार हे धुळ्याचे पालकमंत्री आहेत. आपल्या जिल्ह्यातले मंत्री असूनही बाहेर जिल्ह्यातले मंत्री पालकमंत्री बनवून शासनाला नेमके काय सिद्ध करायचे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर पालकमंत्री आपल्याच जिल्ह्यातले असते तर त्यांना जिल्हावासीयांना विषयी आपुलकी असती आणि त्यांनी तात्काळ नुकसानला प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधीचे आश्वासन दिले असते. परंतु बाहेर जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असल्याने आता मात्र पालक मंत्री येण्याची वाट पहावी लागते.