औरंगाबाद | शहरात ब्रेक द चैन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. एक वर्षापासून सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यामध्ये हातावर पोट असणारे काही मजूर कामगार यांच्या घरातली चूल पेटणे ही कठीण झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले मात्र गरीब जनतेवर यामुळे घरी राहूनही उपासमारीची वेळ आली आहे. कारण त्यांचे काम सुरू तर घर चालते याप्रमाणेच सराफा बाजारपेठ येथील कारागिरांनी हॅलो महाराष्ट्र शी बोलताना आपली खंत व्यक्त केली आहे. सराफा बाजारपेठेत ४०० ते ५०० कारागीर काम करतात. हे कामगार कारागीर सोन्या-चांदीच्या दुकानासमोर बसून पोती विनायचे काम करतात तसेच सोन्याला आकार देण्याचे काम करतात.
त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. सध्या बाजारपेठा बंद असल्याने हे कारागीर अडचणीत सापडले आहेत. रिक्षाचालका प्रमाणे आम्हालाही शासनाने या कठीण काळात मदत करावी अशी मागणी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना केली आहे.