मुंबईकरांचा प्रवास सुखद ! घाटकोपर-अंधेरी थेट मेट्रो सेवेचा मार्ग मोकळा; मार्च अखेर प्रवास सुरू

0
2
mumbai metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मार्च अखेरपासून घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने गर्दी नियंत्रणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या या सेवेच्या चाचण्या सुरू असून त्या यशस्वी झाल्यानंतर थेट मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात धावणार आहे.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका २०१४ पासून कार्यान्वित आहे. सध्या या मार्गिकेवर दररोज ४.८ लाख प्रवासी प्रवास करतात, त्यातील तब्बल ८८% प्रवासी घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घाटकोपर ते अंधेरी हा प्रवास अधिक कोंदट होतो, तर अंधेरी ते वर्सोवा मार्ग तुलनेने मोकळा राहतो. त्यामुळे घाटकोपर-अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवास होणार वेगवान आणि सुकर

या नव्या सेवेमुळे मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून प्रवाशांसाठी प्रतीक्षा कालावधी कमी होईल. दोन मेट्रो गाड्यांमधील अंतरही कमी होऊन गर्दी नियंत्रणात राहणार आहे. नव्या सेवेनुसार, आता घाटकोपर ते अंधेरी आणि घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशा दोन प्रकारच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

अंतिम टप्प्यात चाचण्या

सध्या MMOPL कडून मेट्रो गाड्यांच्या यशस्वी चाचण्या सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा अधिकृतपणे सुरू होईल. या निर्णयामुळे लाखो मुंबईकर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.