औरंगाबाद – प्रेयसी सतत लग्न करण्याचा तगादा लावते म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने तिच्या घरी घरफोडी केल्याचा अजब प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास घेण्यासाठी पोलिसांना आठ दिवस लागले. मात्र तपास पूर्ण झाल्यावर गुन्हेगार समोर आला. पण तो या घरातील महिलेचा प्रियकरच असल्याचे उघड झाल्यावर, या अजब प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी न्यू बायजीपुरा येथे एका 35 वर्षीय महिलेचे घर फोडले होते. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार महिलेच्या घरी रिक्षाचालक सिकंदर खान सतत येत होता. त्यावरून पोलिसांनी सिकंदरला शोधले आणि चौकशीसाठी ठाण्यात आणले. तोपर्यंत फिर्यादीला कोणावर संशय आहे का, तुमच्या घरी आणखी कोणाचे येणे-जाणे असते याबाबत माहिती विचारली. मात्र फिर्यादीने काहीही सांगितले नाही. दुसरीकडे सिकंदरला पकडल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, सिकंदरने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्यामागील कारणाची सविस्तर चौकशी केली. या दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. फिर्यादी महिला ही त्याच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र सिकंदर विवाहित असल्याने त्याचा लग्नाला नकार होता. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी सिकंदरने घरावर डल्ला मारल्याचे कबूल केले. 22 ऑक्टोबरला सिकंदरनेच फिर्यादी महिलेला तिच्या आईकडे सोडले. तेव्हा तो गावी जाणार असल्याचे सांगितले. मात्र तो तसाच माघारी फिरला आणि प्रेयसीच्या घरात चोरी केली. त्याने 57 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. त्यानंतर सिकंदर गायब होता. प्रेयसीला मात्र त्याच्यावर थोडीही शंका आली नाही. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आणि उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांनी मात्र योग्य दिशेने तपास करून या गुन्ह्याची उकल केली.