हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या भाज्या (Top 5 Vegetables) शेती न करता निसर्गत:च उगवलेल्या असतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हंटल जाते . शक्यतो या भाज्या माळरानात, शेतांच्या बांधावर किंवा जंगलात उगवतात. निसर्गत:च उगवून येत असल्याने साहजिकच या भाज्यांमध्ये महत्त्वाची मूलद्रव्य, तसेच अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. याशिवाय रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्मही असतात त्यामुळे आरोग्यासाठी रानभाज्यांची सेवन फायदेशीर असते. सध्या पावसाळा सुरु असून या दिवसात आपलं शरीर मजबूत आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणकोणत्या रानभाज्या खाल्य्या पाहिजेत हे आज आपण जाणून घेऊयात.
1) आघाडा (Aghada) –
आघाडा हि वनस्पती पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. महाराष्ट्रातही तुम्हाला ही भाजी मिळू शकते. यामध्ये अ जीवनसत्व असते. आघाडाची भाजी खाल्ल्याने शरीर बळकट होते आणि तंदुरुस्ती साठी उपयुक्त ठरते. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी गुदभागी वेदना, खाज येत असेल तर आघाडा त्यावर गुणकारी आहे.
2) टाकळा (Sickledpod)- Top 5 Vegetables
ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात ही भाजी उगवते. टाकळा ही रानभाजी पौष्टिक व वातनाशक असते. टाकळ्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने शरीरातील वात व कफदोष निघून जाण्यास मदत होते. कोवळ्या पानाची ही भाजी पचायला सुद्धा चांगली असते. दिसायला मेथीसारखी असणारी ही रानभाजी आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. हृदयविकार, पित्त, खोकला, श्वास इत्यादी आजारांवर टाकळा भाजी खाल्ल्याने फरक पडतो.
3) करटोली (Spiny gourd) –
करटोली ही रानभाजी (Top 5 Vegetables) दिसायला कारल्या सारखी आहे. चवीला थोडीशी कडवट असलेली ही भाजी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. शक्यतो ही रानभाजी डोंगराळ भागात आढळते. डोकेदुखी, सर्दी, खोकला, मूळव्याध, मधुमेह यांसारख्या आजारांवर ही करटोलीची भाजी चांगला उपाय ठरू शकते. तसेच याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहून शरीरही बळकट राहते. त्वचारोग होऊ नयेत म्हणून करटोली ची भाजी नक्की खावा
4) गुळवेल (Heart-leaved moonseed) –
गुळवेल’ ही भाजी झाडांवर अथवा कुंपणावर असते. याला अमृतवेल, अमृतवल्ली या नावाने देखील ओळखले जाते. गुळवेलच्या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. ही भाजी खाल्ल्याने भूक वाढते आणि पचनक्रिया सुधारते. गुळवेलची भाजी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशक्तपणा कमी होतो आणि शरीर मजबूत करण्यासाठी मोठी मदत होते. शरीरातील थकवा घालवण्यासाठी सुद्धा गुळवेलची भाजी उपयुक्त ठरते.
5) काटेमाठ (Katemath)-
काटेमाठ ही वनस्पती पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला आढळते. काटेमाठाची पाने व कोवळ्या फांद्याची भाजी करतात. चवीला अतिशय पौष्टीक असणारी ही भाजी पचनाला सुद्धा हलकी आहे, त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. खास करून गरोदरपणात काटेमाठची भाजी सतत खाल्ल्याने गर्भपात होण्याचे टळते व गर्भाचे नीट पोषण होते. बाळंतिणीच्या आहारात काटेमाठची भाजी दिल्यास तिच्या अंगावरील दूधही वाढते. त्यामुळे स्त्रियांसाठी ही भाजी विशेष महत्वाची आहे.
.