ठोसेघरला भेकर, चौसिंगा वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | भेकर आणि चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना वन विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. शहरातील माची पेठेतील श्री वास्तू अपार्टमेंटमध्ये हा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ठोसेघर येथील नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसान बेडेकर व युवराज निमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये भेकर आणि चौसिंगा यांचे मटण, भेकराचे मुंडके आणि पायाचे खूर जप्त करण्यात आले आहेत.

दुर्मिळ प्राण्यांची काही लोकांनी शिकार केल्याची माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, वनक्षेत्रपाल डॉ.निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळ, वनपाल व पंच अशी दोन पथके तयार करून माची पेठेतील श्रीवास्तू अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. त्यावेळी युवराज निमण, नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल बेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले. घरामध्ये चौसिंगा, भेकर यांची मुंडकी, भेकराचे ताजे मटण आणि पायाचे खूर या कारवाईमध्ये आढळून आले.

अधिक चौकशीमध्ये नारायण बेडेकर यांच्याकडे असलेल्या सिंगल बोर बंदुकीने सकाळी साडेसात वाजता भेकरांची शिकार करण्यात आली व हे भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याच्या मटणाचा वाटा करण्यात आला. या मटणाची वाटणी सुरू असतानाच वन विभागाने ही कारवाई केली. नारायण यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून पिशवी घरामागील खोलीत लपवून ठेवली होती. तीन संशयितांना वन विभागाने शिताफीने सातारा व ठोसेघरमधून अटक केली. सर्व मुद्देमाल, दोन बंदुका, एअरगन, एक सिंगल बोर बंदूक, जिवंत काडतूस, भेकर सोलल्याचा चाकू, लपवलेले मटण आणि कातडे सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.

पंचांसमक्ष या घटनेचा पंचनामा करण्यात आला. संसयितांना अटक करण्यात आली असून वनविभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपाल दीपक गायकवाड, कुशल पावरा, विक्रम निकम, राज मौसलगी, अशोक मलप, मारुती माने, साधना राठोड, अश्‍विनी नरळे, राजेश विरकर, सुहास पवार, सुरेश गबाले, दिनेश नेहरकर, पवन शिरतोडे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.