सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खो-यातील महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकासकामांसाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून कांदाट खोरे व बामणोली-मुनावळे येथील गिरीभ्रमंती मार्गाचे बळकटीकरण करण्यासह आवश्यकता असल्यास चकदेव येथील मार्गावरील शिड्या बदलण्यात येणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे.
महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खो-यात चकदेव व पर्वत ही शंकराची अतिप्राचीन मंदीरे आहेत. तसेच ही ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून ही आकर्षित करत असतात. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. मात्र याठिकाणी जाण्याासाठी अतिशय अरुंद वाट असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. तसेच येथील पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांना काही दिवसापूर्वी पत्राद्वारे केली होती. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्या अनुशंगाने वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आ.मकरंद पाटील यांच्या सोबत बैठक घेऊन हा आराखडा अंतीम करण्यात यावा अशी सूचनाही खा.श्रीनिवास पाटील यांनी त्यावेळी केली होती. याशिवाय चकदेव येथील मार्गावरील शिड्या बदलण्याची गरज असून त्याबाबत कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले होते.
खा.श्रीनिवास पाटील यांनी कांदाट खो-यातील चकदेव, पर्वत महिमनगड या पर्यटन स्थळांचा विकासाकरीता आराखाडा तयार करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार सह्याद्री व्याघ्र राखीव, प्रतिष्ठानच्या सन 2021-22 चे प्रारूप आराखड्यात कांदाट खोरे व बामणोली-मुनावळे भागांसाठी रक्कम रु. 25.00 लक्ष रूपायाची तरतुद करण्यात आली आहे. यातुन कांदाट खोरे व बामणोली-मुनावळे इत्यादी येथील गिरीभ्रमंती मार्गाचे बळकटीकरणा करीता ठेवण्यात आले आहेत. तसेच गरज भासल्यास चकदेव येथील मार्गावरील शिड्या बदलुन घेण्यात येणार आहेत अशी माहिती खा.श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसापासूनची प्रलंबित मागणी मार्गी लागल्याने स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.