भ्रमंती | अजय नेमाने
अजूनही अशी कित्येक खेडे-पाडे आहेत की, जिथं वर्तमानपत्रेसुद्धा पोहचलेले नाहीत. प्रत्येक गावात वाचनालयाची तर बातच नको. अशी अवस्था आहे महाराष्ट्रातील गावांची… त्यातच आता महाराष्ट्र सरकारने भिलार या गावाला पूर्ण पुस्तकमय करून टाकलंय! या मोठ्या पावलाबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे.
भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील गाव. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून ८ किमी अंतरावर असलेले हे गाव. अडीच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भिलारमध्ये जवळपास ९०℅ स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. तसं भिलारला ऐतिहासिक आठवण आहे, महात्मा गांधी ज्यावेळी पाचगणीला भेट देण्यासाठी आले त्यावेळी भिलारे गुरुजी यांनी गांधींवर होणार हल्ला परतवून लावला आणि त्यांचा प्राण वाचवला. दोन वर्षांपूर्वी भिलारे गुरुजींचे निधन झाले. गावात गुरुजींचे घर पाहायला मिळते. घरातील भिंतीवर गुरुजींचा हार घातलेला फोटो पाहायला मिळाला. राज्यशासनाने गावाच्या प्रकल्पासाठी इतका मोठा खर्च केला असताना भिलारे गुरुजींचे साधे एक स्मारक उभारलेले नाही ही मोठी खंत वाटते.
ब्रिटनमधील हे-ओन-वे हे गाव जगातील पाहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तशीच संकल्पना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भिलार या गावी राबवली. त्यानंतर भारतातील पाहिले पुस्तकांचं गाव म्हणून भिलार ओळखू लागले.
बालसाहित्य, कादंबरी, विनोदी पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे, दिवाळी अंक, नियतकालिके, पर्यावरण विषयक पुस्तके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, इतिहास, कथा, कला, चित्रमय पुस्तके असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला आणि पाहायला मिळते. गावातील रस्त्यालगत आणि गल्ली बोळानी असलेल्या ३० घरात वाचनालयाचे ३० वेगवेगळे विभाग आहेत. पण अशावेळी प्रश्न पडतो की, हे लोक आपल्या घरात पुस्तके ठेवण्यासाठी तयार कसे झाले असावेत? या प्रश्नाचं उत्तर ग्रंथालयांची देखरेख आणि हिशोब ठेवणाऱ्या समन्वयकांनी संगीतले; ते म्हणाले गावातील दोन व्यक्ती एक म्हणजे प्रवीण भिलारे आणि दुसरे शशिकांत भिलारे या व्यक्तिंनी पुढाकार घेऊन हा उपक्रम लोकांना समजून सांगितला त्यांच्यात जागरूकता निर्माण केली आणि लोकांकडून परवानगी घेतली. आणि मगच हा उपक्रम साकारला गेला. म्हणून हे श्रेय या दोन व्यक्तीकडे जाते.
महाबळेश्वरच्या कुशीत वसलेल्या भिलारमध्ये सुरुवातीला प्रवेश करताना ‘भिलार : पुस्तकांचं गाव‘ अशा नावाची मोठी कमान लागते. आणि पुढे आल्यानंतर ‘पुस्तकांचे गाव’ प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. त्याठिकाणी उपक्रमावर आधारित एक चित्रफीत दाखवली जाते आणि नकाशा दिला जातो. सुरुवातीला चित्रफीत पाहिल्याने वेगवेगळे विभाग पाहण्याची खूप उत्सुकता असते. वाचकांसाठी ग्रंथालयात सुसज्ज अशी बैठक व्यवस्था केली आहे. सोफा, खुर्च्या, टेबल, फिरते कपाट आणि त्यात पुस्तके… तसेच त्या खोली मध्ये पितळी हंड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचीही सुविधा आहे. वाचक बिंधास्तपणे दिवसभर म्हटलं तरी तेथील पुस्तक घेऊन तिथंच वाचत बसू शकतो. पुण्याच्या ठिकाणी पैसे भरून अभ्यासिका जॉईन करण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी उत्तम! आणि विशेष म्हणजे तेथील पुस्तके तुम्ही बाहेरही वाचायला घेऊन जाऊ शकता; पण अट एवढीच की, ते पुस्तक परत आणून त्याठिकानीच ठेवायचे. जवळपास अशाच प्रकारची व्यवस्था तिसही विभागाला आहे. वाचनाचा छंद असणाऱ्यांची तलफ भागेल अशा प्रकारचं हे सगळं आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी भेट देताना वाटेत, स्ट्रॉबेरीची शेती पाहायला मिळते. एका मालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे एकरी वर्षाला एक लाख रुपयांचे स्ट्रॉबेरीतुन उत्पन्न मिळते. आज इतर शेतकऱ्यांची अवस्था पाहता तेथील शेतकऱ्यांसाठी ही खूपच दिलासादायक बाब आहे. जवळपास ६०० कुटुंब असलेल्या भिलारला स्ट्रॉबेरी आणि पर्यटन व्यवसायाने जगवल आहे. तेथे जाऊन महिनाभर राहायचं असेल तर तशी सोय आहे. हॉटेल लॉजिंगपेक्षा लोकांनी भाड्यावर चालू केलेल्या लॉजिंगची सुंदर आहे. भिंतीवरील चित्रे, जागोजागी मराठीतून फलक, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रपुस्तिका, विनोदी पुस्तकांचा बालकही वाचनाचा आनंद घेतात.
२५ हजारांपेक्षा जास्त पुस्तके असलेल्या भिलार गावात दिवसभर फिरता येईल, वाचता येईल आणि फुकट वेळ दवडला असं कधी वाटणार नाही. मन प्रसन्न आणि उत्साही तर नक्कीच राहते. तर निसर्गात आणि थंड हवेच्या ठिकाणी वसलेल्या टुमदार भिलारला एकदा अवश्य भेट द्या…