सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
शेतीसाठी दहा तास दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील आठ ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन केले. विटा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठेमहांकाळ या ठिकाणी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. माजी खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर हे आंदोलन झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
“शेतकर्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ,” असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. दिवसा सलग दहा तास वीज द्या, वीज तोडणी मोहीम थांबवा, वाढीव वीज दरवाढ रद्द करा, मागेल त्याला वीज कनेक्शन द्या, बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ सुरू करा आदिंसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन झाले. स्वाभिमानीने आपला बझार जवळ शिराळा-कोकरूड मुख्य रस्तावर रस्ता रोको आंदोलन केले.
स्वाभिमानीने पलूस येथील मुख्य, जुन्या बसस्थानक चौकात तासगाव-कराड रस्त्यावर सकाळी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वीज महावितरण कंपनीच्या आनागोंधी कारभारा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेठ- सांगली रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. संघटनेचे राज्य प्रवक्ते एस. यु. संदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. दिग्विजय पाटील, शकिर ताबोळी, आप्पासाहेब पाटील यांची भाषणे झाली. जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, प्रभाकर पाटील उपस्थित होते.