सोलापूर । अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अनेक कारणांवरून दंड केला जातो. मात्र, पोलिसांनी कधी स्वतः एखाद्याचा दंड भरला आहे असे ऐकण्यातही किंवा पाहण्यातही आले नसेल. मात्र, असा प्रकार तुळजापूर या ठिकाणी घडला आहे. तुळजापूर मंदिर परिसरातील वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियमन करत असताना त्यांनी एका जवानाच्या वाहनाला दंड ठोठावला. हा प्रकार त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसकाकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतःच्या खिशातून जवानांचा दंड भरला.
याबाबत अधीक माहिती अशी की, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात वाहतूक पोलिस अनुप गायकवाड आणि जी. आर. माने हे वाहतूक सुरळीत करत होते. यावेळी त्यांनी वाहतूकीला अडथळा आणणाऱ्या संबंधित वाहनचालकांना सूचना देण्यास सुरुवात केली. शिवाय, नियमाप्रमाणे त्यांना दंडही ठोठावला. यावेळी त्या ठिकाणी पाकिस्तानमधून सुखरूप परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्याही वाहनाला पोलिसांनी दंड ठोठावला.
जवान चंदू चव्हाण यांच्या वाहनालाही दंड ठोठावला असल्याचे समजल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिसांनी जवान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांना नियम सर्वांना समान असल्याचे सांगितले. जवानांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकी आहे, तशीच आमच्यामध्येही आहे. वाहतूकीस अडथळा आणल्यामुळे तुमच्या वाहनालाही दंड ठोठावला पण ते पैसे आम्ही ऑनलाईन स्वरूपात भरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांना काही सेंकदातच मोबाईवर पैसे भरल्याचा एसएमएसही आला. यामुळे जवान चंदू चव्हाण हे जवानांवरील प्रेम पाहून भारावून गेले.
यावेळी भारावून गेलेल्या जवान चंदू चव्हाण यांनी संबंधित वाहतूक पोलिसांना त्यांच्या पाकिस्तानमधील अनुभवावर लेखक संतोष धायबर यांनी लिहलेले (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) हे पुस्तक दिले. संबंधित पुस्तक जवान चंदू चव्हाण यांनी पोलिसकाकांना भेट म्हणून दिले. यावेळी पुस्तकाचे लेखक संतोष धायबर उपस्थित होते.