सांगली | जमीन खरेदीच्या सातबारावरील नोंदीबाबत आलेला तक्रार अर्ज निकालात काढून, नोंद करून देण्यासाठी खासगी इसमामार्फत 10 हजाराची लाच मागून चर्चेअंती 8 हजारावर सौदा करणाऱ्या पलूस येथील मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे याला अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) ही कारवाई केली. भिंगारदेवे यांच्याविरोधात या विभागाने तब्बल तीन महिन्यांपासून ‘सापळा’ लावला होता. तो आज ‘सक्सेस’ झाला. भिंगारदेवे याच्यासोबत वसंत रामचंद्र गावडे या खासगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांनी आपल्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. मात्र या खरेदीची नोंद होऊ नये, अशी तक्रार एकाने मंडल अधिकारी भिंगारदेवे यांच्याकडे केली होती. त्याची सुनावणी भिंगारदेवे यांच्यासमोर सुरू होती. याप्रकरणी आलेला तक्रार अर्ज निकालात काढून सातबारावर जमिनीची नोंद करून देण्यासाठी भिंगारदेवे यांनी खासगी इसम गावडे याच्यामार्फत 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी तक्रारदार यांनी दि. 8 मार्च 2021 रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच दिवशी या विभागाने सापळा रचून पडताळणी केली होती. त्यामध्ये मंडल अधिकारी भिंगारदेवे याने खासगी इसम गावडे याच्या माध्यमातून 10 हजार लाच मागितल्याचे व चर्चेअंती 8 हजारावर सौदा ‘फिक्स’ झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानंतर गेले तीन महिने हा ‘सापळा’ लावण्यात येत होता. तक्रारदाराला पैसे घेऊन पाठवले जात होते. मात्र ‘ट्रॅप’ सक्सेस होत नव्हता. अखेर आज पुन्हा भिंगारदेवे आणि गावडे यांच्यासाठी सापळा रचला. त्यानुसार पलूस येथील दत्तनगर येथे तक्रारदार यांना 8 हजार रुपये घेऊन पाठवले. यावेळी गावडे याला ही लाच घेताना रंगेहाथ पकडले. तसेच मंडल अधिकारी भिंगारदेवे याचा या लाचप्रकरणात सहभाग असल्याची खात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला झाली. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, बाळासाहेब पवार, सीमा माने, संजय सपकाळ, अविनाश सागर, अजित पाटील, रवींद्र धुमाळ, भास्कर मोरे, संजय कलकुटगी यांनी केली.
तब्बल तीन महिने लावला होता ‘सापळा’…!
या प्रकरणात तक्रारदार यांनी दि. 8 मार्च 2021 रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत त्याच दिवशी पडताळणीही झाली होती. मात्र गेले तीन महिने ‘लाचलुचपत’चे अधिकारी, कर्मचारी मंडल अधिकारी भिंगारदेवे आणि खासगी इसम गावडे याच्या मागावर होते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी हा ‘ट्रॅप’ अयशस्वी होत होता. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपले प्रयत्न, चिकाटी सोडली नाही. अखेर आज तब्बल तीन महिन्यांनी हा ‘ट्रॅप’ यशस्वी झाला.