औरंगाबाद – कोरोना महामारी च्या नावाखाली लॉकडाऊन लावल्याने मागील 18 महिन्यांपासून राज्यातील शाळा शासन व प्रशासनाने बंद केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे आता पालक आणि शिक्षकांनी कंटाळून अखेर सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे.
युनिसेफच्या मते मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने, मुलांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शाळा सुरु करण्यास आणखी विलंब केल्यास आगामी दशकांपर्यंत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो यामुळे आता सोशल मीडियावर #आताशाळासुरुकरा हा ट्रेंड पालक शिक्षकांकडून सुरू करण्यात आला आहे.
17 ऑगस्टच्या निर्णयाबाबत संभ्रम कायम –
राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत 10 ऑगस्ट रोजी निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग 17 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार होते. मात्र कोरूना च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आता शाळा सुरु करणे योग्य ठरणार नाही, असा सल्ला फोर्सने देताच राज्य शासनाच्या शालेय विभागाने आपले आदेश वापस घेतले. परंतु या निर्णयाला अजूनही कागदोपत्री स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत पालक शिक्षकांमध्ये संभ्रम कायम आहे. हाच निर्णय कायम ठेवत शाळा सुरू करण्याचे शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी पालक शिक्षकांकडून केली जात आहे.