सांगली | आज तिरंगा-तिरंगा करणारे पूर्वी तीन रंगाचा झेंडा अशुभ असल्याचा बहाना करत तिरंगा फडकवत नव्हते. राष्ट्रवादाचा पाठ शिकवणाऱ्यांनी खरा राष्ट्रवादी कसा असतो ते शिकावे. जनता संघर्ष करायला लागली की यांना धर्म आठवतो. ‘आमच्या पक्षात याल तर धुतल्या तांदळा सारखे शुभ्र आणि पवित्र व्हाल’ असा मोदीजींचा नारा आहे, असे मत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड वृंदाताई करात यांनी व्यक्त केले.
विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुल मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमा वेळी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “क्रांतिसिंह यांच्यासारख्या महापुरुषाच्या मार्गावर चालणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल. एकात्मतेसाठी उपयुक्त विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. क्रांतिसिंह शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच अन्य क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहेत. मी आत्तापर्यंत अपवाद वगळता पुरस्कार स्वीकारले नाहीत. हा पुरस्कार नानासाहेब पाटील यांच्या शौर्य आणि वीरतेचा अभिमान आहे. वाघासारख्या बहादूर क्रांतिसिंहांच्या संघर्षमय आठवणीसाठी हा पुरस्कार आदर व नम्रतेने स्वीकारत आहे. हा माझा पुरस्कार नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सर्व लढवय्यांचा पुरस्कार आहे. स्वातंत्र्यानंतर अपेक्षित असणारी एकात्मता निर्माण होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य चळवळीत प्रति सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कम्युनिस्टांच्या, शेतकरी व कामगार यांच्या संघर्षामुळे स्वतंत्र भारताच्या लढ्याला चालना मिळाली. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सावकारांच्या घरात जाऊन क्रांतिसिंह यांनी कागदपत्रे जाळली बँका लुटून गोरगरिबांना मदत केली असे क्रांतिसिंहांचे कार्य आदर्श होते.
देशात एका पक्षाचे सरकार आणण्याचा डाव हाणून पाडा
“महागाई ही समस्या नाही असे म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी खरडा- भाकरी खाणाऱ्या व छत नसणाऱ्या कुटुंबियांचे दुःख पहावे. अनेक बँका, एलआयसी सारखी महत्त्वपूर्ण देशाची संपत्ती विकणारे केंद्र सरकार आहे. विविध मार्गातून मिळणाऱ्या पैशांचा वापर महाराष्ट्रात शिंदे गटातील आमदारांच्या गुवाहाटी, गोवा येथील ऐशोरामासाठी व सत्ता स्थापनेची पूर्वतयारी करण्यासाठी वापरला गेला. मोदी सत्तेत आल्यावर पैशांचा वापर करून बारा वेळा सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला. 2024 पर्यंत हिंदुस्थान मध्ये सर्वत्र एका पक्षाचे सरकार असावे असा डाव आहे, तो डाव संघर्ष करून हाणून पडला पाहिजे” असे आवाहन वृंदा करात यांनी केले.
क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी क्रांती गीत व स्वागत गीत गायले. संघटक ॲड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऍड. नानासाहेब पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर, विश्वास सायनाकर, कॉम्रेड अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. अरुण लाड, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माधवराव मोहिते, ज्येष्ठ विचारवंत बाबुराव गुरव, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, कवी प्रा. विश्वनाथ गायकवाड, ओबीसी नेते सुनील गुरव, दिलीप सव्वाशे, इंद्रजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.