उस्मानाबाद : जकेकूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर बलसूर फाट्यावर हैद्राबाद येथून सोलापूरकडे जाणारा ट्रक पलटी होऊन त्याने पेट घेतला. ही घटना ३१ मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गादी तयार करण्यासाठी लागणारे कापूस गठ्ठे घेऊन ट्रक (क्र. के. ए. ५६- २२७०) सोलापूरच्या दिशेने निघाला होता. जकेकुर गावाजवळील पुल ओलांडून पुढे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक अचानक उलटला. त्या वेळी ट्रकने अचानक पेट घेतला . ट्रकचालक व क्लिनर यांनी कसेबसे सुटका करून किरकोळ अवस्थेत रुग्णालय गाठले. ट्रकच्या आगीचा भडका वाढतच होता.
या वेळेस उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले हे नळदुर्ग येथून शासकीय काम आटोपून उमरग्याकडे येत होते, त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उमरगा व मुरुम येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. प्रथम उमरगा येथील अग्निशमन विभागाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजुने पाणी मारतांना वाहन बंद पडले.
काही वेळाने मुरूम पालिकेचे अग्निशमन वाहन आल्यानंतर आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत ट्रकचा सांगाडा शिल्लक होता. पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, उपनिरीक्षक साबळे, बीट अमलदार शिंदे, कांतु राठोड, महामार्ग वहातूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक पात्रे, कर्मचारी झिंगाडे, गोलंदाज, शिंदे आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group