कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असल्याची दिसत आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर ते कराड लेनवर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी साडे आठच्या सुमारास एका मोठ्या ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात धडकलेल्या ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ते कराड लेनवर आज सकाळी एका मोठ्या ट्रकला पाठीमागून दुसरा मोठा ट्रकने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेला ट्रक चालक अडकून पडला. हा ट्रक नारळाचा असल्याने ट्रक मधील नारळ महामार्गावर पसरले होते.
या अपघाताची माहिती हायवे हेल्पलाईन इन्चार्ज दस्तगीर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. यावेळी हायवे हेल्पलाइनचे कुमार नायकल, श्रीधर जाखले, नितीन येडेकर यांनी घटनास्थळी पोहोचत तत्काळ अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान, हायवे हेल्पलाइन कर्मचाऱ्यांनी तसेच लोकांनी क्रेनच्या साह्याने केबिन तोडून गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला बाहेर काढले व दवाखान्यात दाखल केले. तसेच हायवे हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.