सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला कोब्रा

कराड तालुक्यातील घटना : 25 ते 30 अंड्यासह कोब्राचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोब्रा नाग म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. साप समोर आला की तोंडातून शब्द फुटत नाही. साधे छोटे छोटे साप पाहिले तरी भीती वाटते. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे सुमारे 25 ते 30 अंड्यासह कोब्रा नाग आढळून आला. सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांनी अंडयांसह नागाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथील महादेव विठ्ठल यादव यांच्या स्वप्नपूर्ती बंगल्याच्या पाठीमागच्या भिंतीजवळ आज दुपारीच्या सुमारास बिळामध्ये कोब्रा साप आढळून आला. याबरोबरच त्याची 25 ते 30 अंडीही याठिकाणी आढळून आली. यानंतर महादेव यादव यांनी तात्काळ सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांना त्याबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिळात असलेल्या कोब्राला तब्बल एक तास अथक परिश्रम करून सुरक्षितपणे पकडले.

याबरोबरच त्याची अंडी व पकडलेला कोब्रा सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला अंडयांसह शिंदेवाडी येथील डोंगरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदर कोब्रा साप गेली दहा ते बारा दिवस महादेव विठ्ठल यादव यांच्या घराजवळ वास्तव्यास होता तसेच तो त्यांच्या कुटुंबियांच्या नजरेससही पडत होता यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, आता हा कोब्रा पकडून डोंगरात सोडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल महादेव यादव यांनी सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांचे आभार मानले. पकडलेला कोब्रा पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.