सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव मतदार संघात तसेच सातारा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) उद्योजकांना धमकावत होते. महाराजांच्या गादीला बदनाम करत खोटी टीका केली. खरेतर खंडणी बहाद्दर येथील कामगार नेते, राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. त्यांनी स्वतःच्या युनियन करून उद्योजकांना धमकावले. असे असताना विनाकारण साताऱ्याच्या गादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे आता थांबवायचं आहे, असा इशारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.
राज्यात नव्या सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेले कोरेगावचे आ. महेश शिंदे साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यात आल्यावर आ. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही महाविकास आघाडीत असताना दुजाभाव केल्याचा आरोप केला. बारामती सोडून कोणत्याही भागाचा विकास केला नसल्याची टीकाही आ. शिंदे यांनी केली.
साताऱ्याच्या गादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे आता थांबवायचं आहे. ज्यांनी आजपर्यंत युनियन टाकून उद्योग धंदे बुडवायचा प्रयत्न केला. त्या उद्योजकांना आम्ही ताकद देऊन उद्योग धंदे वाढवणार आहोत. उद्योजकांना जर तुम्ही पैसे काढण्याचे ठिकाण समजत असाल, तर महेश शिंदे इथून पुढे तुम्हाला शंभर टक्के आडवा असेल, असा इशारा त्यांनी शशिकांत शिंदे यांना दिला.