सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील ग्रील,ऑरेंज, रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल असेही बोलले गेले. यापार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महसूलच हवाय तर आमदारांचे ६ महिण्याचे पगार रद्द करा; दारुची दुकाने उघडणे हा पर्याय नाही असं म्हणत देसाई यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
वा रे सरकार तेरा खेल अब लॉक डाऊन होगा फेल असं म्हणत लॉक डाऊन फेल होण्याआधी आणि कोरोनाचे पेशंट वाढण्याआधी तातडीने दारूची दुकाने बंद करण्यात यावीत अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. जर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर सरकारसाठी हा घातक निर्णय ठरेल आणि धोक्याची घंटा असेल असंही देसाई यांनी सांगितले आहे. राज्यात कालपासून मद्यविक्रिसाठी परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर देसाई यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आपला विरोध दर्शवला आहे.
दारु विक्री बंद करावी कारण त्यामुळे घरगुती हिंसाचार वाढेल, गुन्हेगारी वाढेल, पोलिसांवरील हल्ले वाढतील असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. महसूल हवा आहे तर आमदारांचे सहा महिन्याचे पगार बंद करा आणि इतर चैनीच्या वस्तू वरील कर दोन टक्क्याने वाढवा, जास्त महसूल राज्य सरकारला मिळेल असा सल्लाही देसाई यांनी दिला आहे.
पण महिलांचे शाप असणारा पैसा महसूल म्हणून स्वीकारू नका अन्यथा सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी तृप्ती देसाई यांनी दिला आहे. सुप्रियाताई सुळे, रश्मीजी ठाकरे, नीलम ताई गोर्हे याना महिलांच्या समस्या माहीत असूनही आणि यांचे सरकार असूनही असा निर्णय घेण्यात आला आहे, याचे वाईट वाटत असल्याचे देसाई यांनी म्हटले.