अकलूज प्रतिनिधी | जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज पुणे जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सराटी गावचा मुक्काम आटपून भल्या सकाळी तुकोबांनी नीरा स्नान घेतले. त्यानंतर पालखीचे अकलूजच्या दिशेने प्रस्थान झाले.
सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात तुकारम महाराजांच्या पालखीचे रिंगण सकाळी १०.१५ च्या सुमारास पार पडले. त्यानंतर तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी गेली.
दरम्यान अकलूजमध्ये पालखीसोहळ्या बरोबर आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे मोहिते पाटील कुटुंब. पारंपारिक पोशाखात आलेल्या विजय सिंह मोहिते पाटील यांनी तर गळ्यात विना घालून भक्तीमय वातावरणात भरच टाकली.
त्याच प्रमाणे विजयसिंहांच्या पत्नी नंदिनीदेवींनी देखील अभंग म्हणून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.
तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रिंगण स्थळी पूजन करताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील.
राज्यसभेचे माजी खासदार भाजपचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना. सोबत त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील.