पुणे प्रतिनिधी | राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात गल्ली ते दिल्ली जोरदार राजकारण सुरू झाले आहे. पुणे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपला वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्तांची बदली करून एखादा खमका अधिकारी येथे आणावा, असा आग्रह मागणी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांकडे धरला आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांना महिनाभरात पदोन्नती मिळणे अपेक्षित असल्याने पुणे महापालिकेत नवीन आयुक्तांची नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’च्या प्रकल्प संचालकपदी असलेल्या तुकाराम मुंढे यांना पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न असून या पक्षाचे नगरसेवक त्यांच्या नावाची चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणू लागले आहेत.
दरम्यान, मुंढे यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, मुंढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना भाजपसह काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आता सत्ताबदल होताच त्याच पक्षांच्या नगरसेवकांच्या ओठी मुंढे यांचे नाव वारंवार येऊ लागल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.