परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
विजेच्या तारांचा घर्षण होऊन लागलेल्या आगीमध्ये पाथरी तालुक्यातील अंधापूर येथे दोन एकर उभ्या केळी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची घटना शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे .यामध्ये केळीसह ठिबक संच जळाल्याने अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अंधापुरी येथील शेतकरी गणेश शेषराव कोल्हे यांच्या मालकीच्या गट क्रमांक दोनशे आठ (208) मधील दोन एकर क्षेत्रावर मागील जून महिन्यांमध्ये केळीची लागवड केली होती नुकतीच या केळीची तोडणी सुरू होती यामध्ये 30% तोडणी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आज दुपारी ही केळी भरण्यासाठी व्यापाऱ्याचा ट्रक आल्याचं यावेळी शेतकरी गणेश कोल्हे यांनी सांगितलं यादरम्यान बांधावरील वीज वितरणच्या तारेमध्ये घर्षन होत केळीच्या झाडाला आग लागली. यामध्ये केळी पिकाला पाणी देण्यासाठी अंथरण्यात आलेल ठिबक ही जळून खाक झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जोपासलेली केळीची बाग जळाल्याने सदरील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालय.