राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना करोडोंचा चुना लावणाऱ्या दोघांना अटक : सातारा पोलिसांची कारवाई

पाटण | ठाणे – मुंबई येथील कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह कराड -पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सातारा अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे शहर येथून कंपनीचे चेअरमन अरुण आर गांधी, संचालक आदित्य हेमंत रेडीज या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना कराड येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.

याबाबत अधिक तपास सुरू असून यातील संबंधित इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगून त्यांनाही लवकर अटक करू असे अर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री डी. एस. पवार यांनी सांगितले.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत पुढे म्हणले आहे कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया लि. आणि संपर्क अॅग्रो मल्टीस्टेट को. ऑपरिटिव्ह सोसायटी लि. ठाणे या एकच फर्म असलेल्या कंपनीने ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना अर्थिक गुंतवणूकीच्या दीडपट डबल, तिप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवून माहे ऑक्टोंबर 2012 पासून ते 2018 अखेर आर्थिक गुंतवणूकीचा व्यवसाय सुरु केला. या कंपनीत गुंतविलेल्या रक्कमेची मुदत संपून चार ते पाच वर्षाचा कालावधी संपून गेला तरी गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार देण्यात आली होती. तेव्हापासून यातील आरोपी हे फरार होते.

कंपनीच्या सर्व संचालक मंडळाविरोधात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा पाटण पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्याने सातारा आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत या कंपनीचे चेअरमन अरुण आर गांधी आणि संचालक अदित्य हेमंत रेडीज या दोघांना ठाणे येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर आरोपींना कराड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक एम. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. एस. पवार यांचेसह तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, आर. एन. वायदंडे, पी. पी. नलावडे, अजित पवार हे करत आहेत.