सातारा | येथील जुनी एमआयडीसीत असणाऱ्या कंपनीच्या आवारातून चंदन चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. जुन्या एमआयडीसीत एस. के. प्लास्ट नावाची कंपनी असून, याठिकाणाहून चोरट्यांनी चंदनाचे झाड, रोकड, दोन मोबाईल चोरून नेले होते.
चंदन चोरीची तक्रार नोंद झाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तपासाच्या सूचना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना केल्या होत्या. यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरणचे अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांना तपासाच्या सूचना दिल्या.
या पथकाने कोडोलीतील दत्तनगर परिसरातून धीरज कैलास भोसले (वय 20, रा. वडूथ, ता. सातारा) आणि रोहित पितांबर शिंदे (वय 21, रा. संगमनगर, सातारा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले चंदन व इतर साहित्य असा सुमारे 8 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.