शहरात मध्यरात्री दोन ठिकाणी आग भडकली; सुदैवाने जिवितहानी नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले, याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशीरापर्यंत एकमेकांना करीत होते.

चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या परिसरात गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारे काही सिलिंडर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास यातील एक सिलिंडर अचानक फुटले. सिलिंडर फुटल्यानंतर उंच उडाले. त्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या काही भागाचे नूकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कोणी नव्हते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. आवाजामुळे अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री 1 वाजेच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुसऱ्या घटनेत औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या लालाजी एक्झिक्युटिव्ह नावाच्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. लालाजी एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या कॅफेमधील बॉयलरने पेट घेतल्यामुळे आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळ असलेल्या लाकडांमुळे अग्नितांडव झाल्याचं समजतं.