कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटगावच्या जंगल परिसरात दोन मैत्रिणींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मैत्रिणींची नावे शारदा अंबिज आणि मनिषा निरगुडे अशी आहेत. या दोन्ही मैत्रिणी कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडी भागात राहत होत्या. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
शारदा आणि मनिषा या दोघी जिवलग मैत्रिणी कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासी वाडीत राहत होत्या. शुक्रवारी या दोघी घरच्यांना आम्ही रानात जातो असे सांगून घराबाहेर पडल्या मात्र त्या परत आल्याच नाहीत. सोमवारी परिसरातील काही आदिवासी तरुण याच जंगल भागात रानभाज्या आणण्यासाठी गेले असताना त्यांना शारदा आणि मनिषा यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर या आदिवासी लोकांनी याची कल्पना गावकऱ्यांना दिली. यानंतर मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला.
यानंतर हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोघींचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात गावातील समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघी मैत्रिणींचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही आत्महत्या होते की हत्या याचा उलगडा होणार आहे. या दोघी मैत्रिणींपैकी एक कायम आजारी असायची तर दुसरीला घरातील कामांचा त्रास व्हायचा, याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.