कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरु आहे. कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शेत शिवारात ऊस तोड सुरु असताना दोन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची घटना आज दुपारी घडली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यात विंग परिसरात बिबत्याचा मुक्तपणे संचार असल्याने ग्रामस्थांनी अनेकवेळा पाहिले होते. त्यानंतर भोळेवाडी परिसरात वन विभागाच्या वतीने बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी भोळेवाडी येथील काशिनाथ गिरी यांच्या डोंगराजवलीळ उसाच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ऊसतोड मजुरांना शेतात साधारण 20 ते 30 दिवसाची दोन पिल्ले आढळून आली.
बिबट्याची पिल्ले आढळून आल्यानंतर शेतकरी व मजुरांनी याबाबतची माहहती वन विभागाच्या अधिकाऱ्याना दिली. माहिती मिळाल्यानंतर तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक शितल पाटील, उत्तम पांढरे, शंभू माने, अश्विन पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिबट्याला ताब्यात घेत परिसराची पाहणी केली.