Satara News : साताऱ्यात एकाने रात्री तर दुसऱ्याने सकाळी घेतला गळफास

Satara Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पोलिसांना समजले नाही. त्यांच्या कुटुंबियांकडे पोलीस चौकशी करत आहेत. जितेंद्र जगन वासकळे (वय 15, रा. चंदननगर, कोडोली, सातारा), अथर्व बसवराज दोडमणी ( वय 14, रा. सह्याद्री पार्क, शाहूपुरी, सातारा) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अथर्व दोडमणी हा साताऱ्यातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. मंगळवारी सकाळी 9 वाजता त्याने घरात नाष्टा केला. त्यानंतर तो बाहेर निघून गेला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्याशेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतल्याचे घरातील कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

कुटुंबीयांनी अथर्वचा गळफास सोडवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अथर्व हा तापट स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखे झाले नाही, तर तो चिडायचा, असे पोलिस सांगितले. मात्र त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे समोर आले नाही. या घटनेमुळे कॉलनीमध्ये एकच खळबळ उडाली.

तर जितेंद्र वासकळे हा शहरातील एका शाळेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्याने त्याच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री 11:30 वाजता घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, असे पोलिसांनी सांगितले.

सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात सोमवारे आणि मंगळवारी घडलेल्या या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. या हादरून टाकणाऱ्या दोन धक्कादायक घटना समोर आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.