सातारा | महाबळेश्वर शहरात असलेल्या गणेश हौंसिंग सोसायटीत थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संशयितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
आमशी व विवर, महाबळेश्वर येथे वास्तव्याला असणारे महावितरणचे दोन कर्मचारी बुधवारी वीज बिल वसुलीचे काम करत होते. वसुलीसाठी हे कर्मचारी गणेश हौसिंग सोसायटीत गेले होते. यावेळी संशयिताने या दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून एका जखमीला पुढील उपचारासाठी वाई येथे हलवण्यात आले.
मारहाण झाल्यांनतर संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.