कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा आज मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना व्हायरसबाबत आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारण राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असलेली दिसत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत देशात कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले असून 1390 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. सध्या भारतात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.61% वर गेला आहे. त्याच वेळी रिकव्हरी रेट 98.78% आहे. मात्र अचानक रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू
कोरोना बाधितांचा आकडा वाढला… pic.twitter.com/PeZZ4Z7BeV
— santosh gurav (@santosh29590931) April 3, 2023
दरम्यान सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्नाच्या संख्येत वाढ होत असलेली दिसत आहे. जिल्ह्यात सध्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मास्क वापरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन
कोविड- 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविणेकामी आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परिपत्रक काढून मास्क वापरण्याचे शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना आवाहन केले आहे. कोविड- १९ व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. सदर कोविड- २९ विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिकणे, खोकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराचे अनुषंगाने ५० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड- १९ ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजीघ्यावी, असे परिपत्रकात म्हंटले आहे.