Friday, June 2, 2023

टेम्पोची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; 2 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा काही विचित्र अपघात होतात. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. अशाच भीषण अपघाताची घटना शुक्रवारी चांदणी चौक येथे घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या एका टेम्पो चालकाने टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती कि या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

या घटनेत रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (वय 44, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), सीताबाई हरी चव्हाण (वय 54, रा. तळोजा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर मनोहर हरी चव्हाण (वय 26), राजा हरी चव्हाण (वय 35), शिवाजी मारुती खडतरे (वय 30) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. २४ रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका चांदणी चौकात टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक महेश सरवडे आणि क्लिनर टायर बदलत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 14 जीयु 5814 ) याने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक महेश विश्वनाथ सरवडे आणि महिला सीताबाई हरी चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेचा क्लिनर आणि अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालकाणे घटनास्थळी न थांबता तत्काळ घटनास्थलावरून पलायन केले.

या घटनेनंतर गोपाळ भीमला चव्हाण (वय 45, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरार असलेल्या आयशर टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.