औरंगाबाद – पेट्रोल व डिझेल ने भरलेल्या कॅन चार चाकी मध्ये ठेवून चोरट्या पद्धतीने बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शिऊर पोलिसांनी गजाआड केले आहेत मात्र एक जण त्या ठिकाणावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर जवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश केळे हे आपल्या सहकाऱ्यांसह अवैध धंद्यांची माहिती काढून रेड करण्याकरता खाजगी वाहनाने जात होते. नागवाडी फाट्याजवळ असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुप्त बातमीदारांना मार्फत माहिती मिळाली की दसकुली गावातील तलावाजवळ कारमध्ये पेट्रोल व डिझेल ने भरलेल्या कॅन येथून निघणार आहेत. ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक निलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, अविनाश भास्कर, अमोल मगर, गणेश गोरक्ष, अमोल कांबळे यांनी पंचासह दिलेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला.
नंतर कार ची तपासणी केल्यानंतर कार (एम एच 14 सीके 9660) मध्ये 20 लिटर डिझेल ने भरलेल्या चार कॅन व 35 लिटर ची एक कॅन असे एकूण 115 लिटर डिझेल व वीस लिटर ची पेट्रोल ने भरलेली केन असे एकूण 13 हजार 980 रुपयांचे इंधन पकडण्यात आले. तसेच या गुन्ह्यात वापरलेली दहा लाख किमतीची कार ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिसांनी किशोर जाधव(32) व गणेश जाधव (23) या दोघांना अटक केली असून, अंधाराचा फायदा घेत सुरज निकम हा चार कारची चावी घेऊन फरार झाला आहे. दरम्यान ट्रॅक्टरच्या सहाय्याने गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.