सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर- पोलादपुर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथुन पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी दिली.
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्ते, घाट, पुल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. नदी, नाले, ओढे पात्रातुन मोठया प्रमाणावर दगड, माती, वृक्ष रस्त्यावर येवुन मोरी, पुल यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्ता वाहुन जाणे, पुल वाहुन जाणे अशा प्रकारे देखिल मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणी मोठया प्रमाणावर दुरूस्तीची कामे सुरू आहेत. या सर्व कामांची आ. मकरंद पाटील यांनी मागील आठवडयात भेट देवुन पाहणी केली होती. यावेळी आ. मकरंद पाटील यांनी ही सर्व कामे पावसाळया पुर्वी पुर्ण करा असे आदेश दिले होते. त्याच प्रमाणे या पावसाळयात रस्ता बंद राहणार नाही याची खबरदारी घ्या अशा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या होत्या.
आ. मकरंद पाटील यांनी केलेल्या सुचने प्रमाणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी कामाचे नियोजन केले असुन उद्या सोमवार (दि. 20) जुन रोजी महाबळेश्वर- पोलादपुर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथुन पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. उद्या रस्त्यामध्ये पाईप टाकणे डोंगराकडील सुटलेला भाग की जो पावसाळयात खाली येवून रस्ता बंद होण्याचा धोका आहे. तो सर्व भाग काढुन टाकण्यात येणार आहे. या शिवाय नदी, नाले, ओढे या पात्रातील अडथळे दुर करून पाण्याच्या प्रवाहाला नैसर्गिक मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे. तसेच कामाचा अंदाज घेऊन उर्वरीत काम हे बुधवारी देखील करण्यात येणार असल्याने बुधवारी देखील सदरचे मार्ग बंद ठेवण्यात येतील. तरी, या मार्गावरून वाहतुक करणारे प्रवासी वाहनांनी या बदलाची नोंद घ्यावी व सार्वजनिक बांधकाम विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी केेले आहे.