औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या रोजच तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवरच महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी शहरात कोरोनाची उपचारसेवा देणार्या खासगी व सरकारी अशा एकूण 70 रूग्णालयांत दोन हजार बेड्स रिक्त असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहरात रोजचे सरासरी आठशे रूग्ण निघत असून त्यात तेवढेच रूग्ण आता बरे होऊन रूग्णालयातून बाहेर पडत आहेत, असे त्यांनी बेडस्ची समस्या जाणवणार नसल्याचे दर्शवले. मात्र आयसीयू बेड्सची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे ते सध्या घरीच होम आयसोलेशद्वारे उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवरच पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी सांयकाळी फेसबूक लाइव्हद्वारे संवाद साधत शहरातील कोरोना संसर्गाची सध्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी नमूद केले की, सध्या शहरात एकूण 9,613 कोरोनाचे सक्रीय रूग्ण असून 3,549 रूग्ण हे घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. बाकीचे शहरातील विविध सरकारी व खासगी अशा एकूण 70 रूग्णालयांत उपचार घेत आहे.
यापैकी डीसीएच 13, पालिकेचे कोविड केअर सेंटर्स 15 तर खासगी 40 रूग्णालयांत कोरोना रूग्णांसाठी एकूण 7,433 बेड्सची व्यवस्था केलेली आहे. यापैकी 5,370 बेड्स आरक्षित झाले असून सध्या दोन हजार बेड्स रिक्त आहेत. मात्र यात आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते आहे. 212 व्हेंटीलेटर बेड असून, यातील 205 बेडवर रुग्ण आहेत. 561 ऑक्सिजन बेड असून, यातील 515 बेडवर रुग्ण आहेत, असे त्यांनी नमूद केले.